Monday, June 24, 2013

ध्रुव

टेबलावर फाइल्सचा गठ्ठा पडला होता पण ध्रुवला तो दिसत नव्हता. त्याच्या डोक्यात वेगळीच चक्र फिरत होती. फोनच्या आवाजानी तो परत माणसात आला. बॉस बोलवत होता. पटकन त्यांनी टेबलावरचे पाय काढून टेबलाखाली ठेवलेल्या बुटांमधे खोचले.  तडख चालत गेला आणि नेहमीसारखं धाडकन बॉसच्या केबिनचं दार उघडलं. बॉस फेसबुक चेक करत होता. घाबरून त्यांनी पटकन विंडो बंद केली. कश्याला घाबरला? तुम्ही असं म्हणू शकता की तो एकदम आलेल्या आवाजाला घाबरला. पण माझा असा अंदाज आहे की तो एकदम आलेल्या ध्रुवला जास्ती घाबरला. ध्रुवला जवळपास सगळीच लोकं थोडंफार घाबरायची. तसा वागायला बोलायला चांगला होता. दिसायलाही काही भीतीदायक नव्हता. पण का कोणास ठाऊक त्याच्याशी बोलताना लोकं बेसावद पकडली जायची. तो मुद्दामून असं काहीच करायचा नाही.

आई : काल जोशी काकूंना काय म्हणाला माहितीये का? तुम्ही कायम उशिरा का येता? काकांशी सारखं भांडत असता म्हणुन का? बिचाऱ्या गडबडून गेल्या एकदम. 
बाबा : पोच नाहीये कार्ट्याला.

पण ध्रुव फटकळ नव्हता. कारण लोकांना असं गार करण्यात त्याला काहीच आनंद नव्हता. उलट लोकांना तो आवडावा आणि त्याचं कौतुक करावं असाच कायम त्याचा प्रयत्न असायचा. पण नकळत घडणाऱ्या गोष्टी बदलणार तरी कश्या? चुणचुणीत किव्हा तुणतुणित असे शब्द त्याच्यासाठी अगदी योग्य आहेत. जन्माला येताना जी धक्का बुक्की करावी लागते ती काही लोकं कायमच चालू ठेवतात. त्याच्या जीवाला स्वस्थपणा माहित नव्हता. त्याला सगळच करायचं होतं. पण एक असं काहीच नाही. एखादी नवीन योजना मनात आली की वेड लागल्या सारखा त्याच्या मागे लागायचा. लहान मुलं कस नवीन खेळणं पाहिलं की जग विसरून त्याच्या मागे धावतात तसं. पण ती गोष्ट करायला लागला की त्या मधला रस कमी कमी होत जायचा. उसाचा रस जसा गटगट प्यायल्यावर संपत जातो तसा (हे त्याचे शब्द माझे नाहीत !) मग काही काळ खूप चिडचिडा व्हायचा. नवीन काहीतरी शोधायची धडपड सुरु करायचा. अश्या वेळेला त्याच्या बायकोला तो असह्य व्हायचा. आता मी काय करू? ह्याचा कंटाळा आलाय त्याच्यात काही मजा नाही अशी भुणभुण लावायचा. बरं त्याची बायको स्वयम सुखी. तिला ह्या गोष्टी कळायच्याच नाहीत. ती म्हणायची तुला हवं ते कर. मग त्याची अजून चिडचिड व्हायची. ती उदास आहे नवीन गोष्टी करायला आवडत नाहीत असं वाटायचं त्याला. आणि तिला कदाचित हे कळत नसावं की ह्याला सारखं काहीतरी नवीन का शोधावं लागतं. ध्रुव खूप विचार करायचा. रात्र रात्र जागायचा. त्याच्या बायकोला तिची झोप खूप लाडकी होती. कधी कधी मध्य रात्री तिला उठवून त्याला आत्ताच झालेली कविता ऐकवायचा. 

सवईचे गुलाम सगळे. श्वासांना इथे किंमत नाही. 
वर्षामागे वर्षे लपली. क्षणांची तर गणनाच नाही. 

थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या लग्नाची वाट लागली होती. पण त्याला ती आवडायची. ती बरोबर असताना त्याची चुळबुळ थोडी कमी व्हायची. पण हे तो कधी बोलू शकला नाही. 

ऑफिस मधे मात्र तो काहीही बोलायचा. इतर लोकांना वाटते तशी नोकरी जाण्याची फालतू भीती त्याला कधीच वाटली नाही. खूप काम करायचा. स्वतःचं. इतरांचं देखील. पटपट बोलायचा. दुसरा हळुहळु बोलत असेल तर त्याला सारखा तोडून प्रश्ण विचारून पटकन माहिती उकळायचा. जबरदस्तीचं का होईना पण ऑफिस मधे एक ध्येय असतं. कदाचित म्हणुनच त्याला इथे नेहमी इतकं दिशाहीन वाटत नसावं. उत्साहाची तर त्याच्याकडे कधीच कमतरता नव्हती. ऑफिस मधल्या इतरांना तो खूप भारी वाटायचा. एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर कसा बिनधास्त आणि निर्भीड वावर शक्य होतो तसाच त्याचा ऑफिस मधे असायचा. सगळे जेव्हा stock options, in hand, LTA वगेरे बोलत असायचे तेव्हा ध्रुव चेस मधल्या खेलींचा विचार करत असायचा. सर तुमचं चुकतय, असं सगळ्यान समोर बॉसला म्हणायचा. आणि बॉसही गप्पं बसायचा कारण बहुतेक वेळा ध्रुवचं बरोबर असायचं. असही नोकरीवरून काढण्यापेक्षा त्याला कंटाळा येउन तो नोकरी सोडण्याची शक्यता जास्ती होती. ध्रुव ला अंधाराची खूप भीती वाटायची. शॉवरमधे साबण लावलेला असतानापण तो डोळे मिणमिणते उघडे ठेवायचा. एकटेपणाची त्याच्याहून जास्त भीती वाटायची. आजूबाजूला चार लोकं पाहिजेत. ओळखीची नसतील तरी चालेल. नुसती असली पाहिजेत. आपण कसे दिसतो, आपण हुशार आहोत का सामान्य, आपलं बरं चाललय का नाही, आपण चांगले आहोत का वाईट, हे इतरांच्या प्रतीक्रीयेत्न आपल्याला सतत जाणवत असतं. आत्मविश्वासाची कमतरता असेल कदाचित पण ध्रुव ला ह्या प्रतिक्रिया सारख्या हव्या असायच्या. आणि त्या न विचारता मिळाव्या असं पण वाटायचं. ऑफिस मधे त्याची ही गरज पुर्ण व्हायची. घरात दुर्दैवानी तसं व्हायचं नाही. तिची आणि ह्याची लय कधी जुळलीच नाही. शेवटी शेवटी तर दोघं एकाच घरात दोन वेगळ्या खोल्यांमध्ये राहायला लागले. त्याची चरफड तशीच चालू राहिली. इतकं शोधूनही त्याच्या आयुष्याला दिशा लाभली नाही. आई वडील काय विचार करून नावं ठेवतात कोणास ठाऊक?

कधी कधी असं वाटतं त्यांनी आयुष्यभर जे शोधलं ते एका भिंती पलीकडे होतं. पण ती भिंत कधी त्याला पाडता आली नाही.

Labels:

2 Comments:

Blogger Abhijit said...

Based on real life ka asach suchala?

10:49 AM, June 25, 2013  
Blogger siddhya said...

Hi Abhijit,

Everything is based on real life :)

11:51 AM, June 25, 2013  

Post a Comment

<< Home