पोस्टकार्ड
पत्र पाउसाच्या थेंबासारखं असतं. ते कुठलीना कुठलीतरी भावना रुजवतच.
म अशी पत्र रोज निर्व्याजपणे पोचवणारा पोस्टमन कधीतरी त्या शब्दांमध्ये हरवत असेल का? गजेंद्र अहिर्यांचा पोस्टकार्ड हा चित्रपट मला फार आवडला आणि त्याचा खूप कंटाळा पण आला. हे परस्पर विरोधी नाहीये. दोन तास हा मोठा कालावधी आहे. त्यात असंख्य वेळा तुमचे विचार आणि भावना बदलतात. चित्रपट बघून बाहेर पडताना, कसा वाटला? ह्या प्रश्णाचं उत्तर दुसरं कोणी नाही विचारलं तरी आपण स्वताचं स्वताला देतोच. ते कदाचित ह्या सगळ्या भावनांची बेरीज केल्या सारखं असावं. मला इथे बेरीज करायची नाहीये.
तीन गावं. तिथले तीन पत्ते (पत्ती नाही!). तिथे आपली आयुष्य मांडून बसलेली तीन माणसं. आपल्या सर्वात जवळच्या माणसापासून दूर गेलेली. वर्षानुवर्षं वाट बघत आणि भेटीची आस जागी ठेवत काढलेली. आणि ती भेट झालीच नाही तर? काय होत असेल? मरणानी तरी सुटका होते अश्यांची? का ती शेवटची झोप पण नीट लागणार नाही? आणि ह्या सगळ्या अतृप्त इच्छांमधून संथ गतीने वाट काढत चाललेला पोस्टमन. ज्याचा खर तर ह्या पात्रांची काहीच संबंध नाही. पण तरी त्यांच्या आर्त हाकेमुले खेचत गेलेला.
सगळ्याच कथा मला भावल्या. डोळ्यात पाणी आणणाऱ्या होत्या. सई ताम्हणकरनी सहज आणि अतिशय उत्कृष्ठ अभिनय केलाय. "कष्ट करणाऱ्या म्हाताऱ्या माणसाची देवावरची श्रद्धा उडायला नको" ह्या तिच्या वाक्याला डोळ्यातले पाणी बाहेर येऊ का विचारत होते (मी त्याला गप बस म्हणालो). राधिका आपटे अप्रतिम कलाकार आहेच. ह्या चित्रपटात पण तिचं काम सुंदर झालं आहे. चित्रपट जसा पुढे पुढे जातो तसं त्याला नुसतं भावनिक सोडून गूढतेचं वळण मिळायला लागतं. नाव सांगणं टाळता जी. ए. च्या कुठल्याश्या कथेचा उल्लेख होतो (त्यावर आधारित असावी?). भारावून टाकणारं संगीत आणि हरिहरन, कविता कृष्णमुर्ती ह्यांचे आवाज. Cinematography तर सध्याच्या मराठी चित्रपटांची कमालच असते. म्हणून त्या विषयी बोलायलाच नको. Technically काही आवडलं नसेल तर वैभव मांगले ह्यांचे पात्र (उगीच एकांगी केलेले) आणि सुबोध भावे ह्यांची वाकडी टोपी (काहीही काय?).
मला कंटाळा आला तो परिस्थिती पुढे हताश झालेल्या मराठी माणसाचा. आणि बहुतेक वेळा परिस्थिती म्हणजे हवे तितके पैसे नसणे. म त्यासाठी त्याग, रडारड, दुःख्. एखादी गोष्ट आपल्याला मिळणं शक्य नाही हे समजून पुढे न जाता येण फारच क्लेषदाई असणार. मला कल्पना आहे की माझ्या सारखं सुखासीन आयुष्य जगणार्याला हे म्हणणं सोपं आहे. हुशार माणूस आपल्या इच्छा अपेक्षा आपल्याला पेलतील अश्याच निवडतो. पण एखाद्या असाध्य गोष्टीची अनावर आसक्ती निर्माण झाली तर? नरकाचा रस्ता मोकळा होत असावा.
[photo courtesy: rangmarathi.com]
Labels: movie review
0 Comments:
Post a Comment
<< Home