सावंतकाका
हा माणूस अमेरिकेत गेला आणि अमेरिकेचा झाला. तो अमेरिकेत कसा पोचला ह्या कथेचे आम्हाला पारायण झाले आहे. बाबा ती कथा आम्हाला रामायण किव्हा सिंदबादच्या सुरस कथा असल्यासारखे सांगत असत. म्हणूनच कदाचित माझ्या मनात मी ते इतर पौराणिक महापुरुषांसारखे असतील असं गृहीत धरलं होतं. मुकुट ढाल तलवार घेर असलेला झब्बा वगैरे. पण त्याला ह्या वेषात मी कधीच पाहिलं नाही. कदाचित आम्ही घाबरू म्हणून शस्त्रास्त्र घरीच ठेऊन येत असेल. मी लहान असताना तो पुण्याला आमच्या घरी अनेकदा यायचा. आल्यासरशी एक दोन आठवडे रहायचा देखील. तो आला की घरात प्रचंड दंगा असायचा. मोठ्यामोठ्यांनी बोलायचा आणि खूप बोलायचा. बाबांना खूप कौतुक होतं त्याचं. रक्ताचं असं काहीच नातं नव्हतं खरं तर. राजूकाकाचा शाळेतला मित्र. उंची बेताचीच. खरं सांगायचं तर बुटकाच होता. पण एखाद्या खेळाडूसारखी मजबूत ठेवण. आमच्याशी बॉक्सिंग करायचा. मस्ती करण्यात एक नंबर. आम्हाला दुसरं काय हवं असायचं? लव आणि कुशला लक्ष्मण काकांकडून काय मिळायचं माहित नाही पण आम्हाला मात्र सावंत काकाकडून वर्षानुवर्षं 'Toblerone' आणि 'Hershey Kisses' (मोदकासारखी दिसणारी) चॉकलेट मिळायची. चवीला काही खास नसायची (हा मोठेपणी आलेला खतरुडपणा. लहानपणी सगळच भारी वाटायचं) पण दिसायला इतकी भारी असायची की मी ती गावभर दाखवत फिरायचो. अमेरिकेहून आलेली चॉकलेट! पाचवीच्या वार्षिक परीक्षेनंतर आला तेव्हा माझ्यासाठी एक छोटा विडिओगेम घेऊन आला. त्या प्रकारामुळे तर माझं 'social status' फारच वधारलं. लोणीविके दामले आळी ते खुन्या मुरलीधरा पर्यंत सगळ्या पोरांमध्ये माझं नाव झालं. उन्हाळ्याची सुट्टी नुकतीच सुरु झाली असल्यामुळे timing पण perfect होतं. तासंतास boundary वर उभं करणारी मोठी मुलं आता मला opening batting द्यायला लागली. ती तीन महिन्यांची सुट्टी पण मी सावंत काकानी दिलेल्या गोष्टींमध्ये धरतो. त्याला स्वतःचं मुलबाळ नव्हतं हे मला फार उशिरा कळलं. सावंत काकूही क्वचितच भेटल्या. म्हणून तो आमचं घर सोडून इतर जगात काय करतो कसं वागतो कोण असतो ह्याचा माला काहीच अंदाज नव्हता. त्या काळी इंजिनिअर होणाऱ्या फार कमी लोकांपैकी तो होता म्हणे.
गोष्टींव्यतिरिक्त त्यानी अनेक मोलाचे सल्ले सुद्धा दिले. माझ्या डोक्यात उच्चशिक्षण घ्यावं का नाही आणि घेतलं तर कुठलं कुठे वगेरे वारे वहात होते. सावंत काका घरी आलेला असताना बाबांनी विषय काढला. माझं काही ठरत नव्हतं. आयुष्यातली अजून दोन वर्ष शिक्षणात घालवायची? काही फायदा होईल का? तेव्हा सावंत काका आवर्जून म्हणाला. शिकायची इच्छा असेल तर शिकून घे. शिक्षण कुठलं का असेना कधीच वाया जात नाही. पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी त्याचा नक्कीच फायदा होतो.
मी धोपट मार्गांनी अमेरिकेत जाऊन थडकलो. इथे गोऱ्यालोकांपेक्षा देशी लोकच जास्तं भेटले. आई बाबांना खूप कौतुक आहे मी इथे आल्याचं. पण मला माहितीये ह्या देशात येणं इथे रहाणं संसार थाटणं एवढं काही अवघड राहिलं नाही आता. त्यापेक्षा दिल्ली किंवा चेन्नईला जाऊन राहणं जास्त जिकिरीचं काम आहे. पण तीस चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा सावंतकाका आणि त्याच्या बरोबरची मंडळी अमेरिकेत पोचली तेव्हा चित्र खूपच वेगळं असणार. त्यांना हा देश नवीन. ह्या देशाला ही लोकं नवीन. कोण कसा वागवेल सांगता येत नाही. प्रथा वेगळ्या बोली कळायला अवघड. शाकाहारी खाणं कुठे मिळेल? दिवाळीला आकाशकंदील कसा बनवायचा? तो बाहेर लावलेला चालेल का? हजार कोडी. 'अमेरिकेत हे मिळत नाही च्यायला!' सावंतकाका हे वाक्य चहा पिताना आंबे खाताना पत्ते खेळताना सारखा म्हणायचा. आता अमेरिकेत कोपऱ्याकोपऱ्यावर 'Indian Store' असतात आणि 'Vegetarian Option' बहुदा सगळीकडेच मिळतो. तेव्हा तसं काहीच नव्हतं. रोज काहीतरी नवीन शोधायचं रोज काहीतरी नवीन समजून घ्यायचं. सावंतकाकू एकदा आईला सांगत होत्या की बॉस्टन मधल्या एका grocery store मध्ये त्यांनी अचानक मराठी बोलण्याचा आवाज ऐकला आणि हातातलं सगळं सोडून त्या कोण बोलतंय हे बघायला धावल्या. रोमहर्षक जगणं वगैरे म्हणतात ते असंच असावं कदाचित. मी इथे मराठी लोकं avoid करत फिरतोय. इतकी झालीयेत.
मध्ये अनेक वर्ष सावंतकाकाशी काहीच संपर्क राहिला नाही. शिक्षण नोकरी संसार पोरंबाळं ह्यात पुरता गुमून गेलो होतो. लहानपणी अतिशय महत्वाच्या असलेल्या व्यक्ती मोठेपणी irrelevant होऊन जातात. बाबांकडून खबरबात कळत रहायची. पण भेट नाही. मी पुण्यात तेव्हा तो अमेरिकेत. तो अमेरिकेत तेव्हा मी पुण्यात. दोघंही अमेरिकेत असलो तरी अमेरिका केवढा मोठ्ठा देश (म्हणायला). वगैरे वगैरे. म्हणून काल त्याला भेटायला जाताना थोडं guilty वाटत होतं. पण थोडंच. बहुतांशी excitement होती. ज्यानी आपल्याला इतकं दिलं त्याला आपण काय देणार? तरी जाताना pastry घेऊन गेलो. आणि आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसून परत आलो.
झालं तसं काहीच नाही. काकानी घराचं दार उघडलं स्वागत केलं आत ये म्हणाला. पूर्वी आमच्या घरी घुमणारा त्याचा तो दमदार आवाज आता थोडा नमला होता. पण वयोमानानी ते व्हायचंच. किंवा त्यानी स्वतःहून हळू बोलायची सवय करून घेतली असेल. अमेरिकेत मोठ्यानी बोलणं असंस्कृतपणाचं समजतात. घर मात्र मोठं होतं आणि छान ठेवलं होतं. मधल्या खोलीत मोठा टी. व्ही. त्याच्या समोर एक आरामखुर्ची आणि कोच वगैरे. काका जाऊन आरामखुर्चीवर बसला. काकू आत स्वयंपाक करत होती ती बाहेर आली. माझ्या चौकश्या झाल्या. त्यांच्या चौकश्या झाल्या. पुण्याचा विषय निघाला अमेरिकेविषयी गप्पा झाल्या. काहीच वावगं झालं नाही पण काहीतरी विचित्र वाटत होतं. सगळं घर सगळ्या चर्चा पोकळ वाटत होत्या. त्यातला जीव निघून गेल्यासारख्या. टी. व्ही. वर पूर्ण वेळ मराठी मालिका चालू होत्या. जेवण झालं आणि मी निघालो. काकाला अच्छा म्हणालो तर टी. व्ही. बघत बघत 'अच्छा.. परत ये कधीतरी' म्हणाला. काकू दारापर्यंत आली. माझा पडलेला चेहरा बघून जाताना म्हणाली 'थोडे senile झालेत'. तिचं दुखः ती जाणे.
नंतर अनेक दिवस काकूचं एकच वाक्य डोक्यात घुमत बसलं होतं. काहीतरी विषय काढायचा म्हणून मी अमेरिकेत किती south Indian हॉटेलं झालीयेत असं काहीतरी म्हणत होतो. त्यावर काकू एकदम म्हणाली होती 'काय उपयोग आहे? हे जिथे जातील तिथे फक्त एकच डिश खातात.. मसाला डोसा!'. बाबांच्या नजरेत आणि पर्यायानी आमच्या पण नजरेत सावंतकाका म्हणजे काहीतरी नवीन जगावेगळं धडाडीचं करणारा. तो असा नीरस निर्जीव आणि routine कसा झाला असेल? पण खरं सांगायचं तर मी थोडा घाबरलो होतो. माझं पण असंच होईल असं मला खूप दिवसांपासून वाटतंय. तरुणपणी तुम्ही अमेरिकेत येता तेव्हा तो खूप मोठा बदल असतो. मजा असते. पण जसे इथे स्थायिक होता तश्या गोष्टी खूप सहज आणि सोप्या होऊन जातात. भारतात जशा रोजच्या छोट्या छोट्या लढाया असता तशा इथे नाहीत. दूधवाल्याशी लढ रिक्षावाल्याशी लढ. ह्या काही कौतुकाच्या गोष्टी नाहीत. पण लढणं म्हणजे नेहमी कटकटीचं असतं असं नाही. कधी मजेत हसत खेळत देखील असतं. अळणी आयुष्यात काहीतरी खळबळ. इथे सगळं शांत आणि सुरळीत. हजार activity आहेत इथे करायला. पण मला ह्या सगळ्या activity नोकरी सारख्याच वाटतात. मूळ आयुष्यापासून तुटलेल्या. तिथे काहीही घडलं तरी परत घरी आल्यावर तीच शांतता तेच routine. जो माणूस तरुणपणी इतका कमालीचा जगलाय त्याची चाळीशी आणि पन्नाशी अशी जावी? मग मेंदू झडणार नाहीतर काय होणार?
सावंतकाकानी दिलेल्या गोष्टींमध्ये हा 'shock' पण जमा करतो. आणि परत आपल्या मायदेशाकडे जाणारी वाट पकडतो!
Labels: fiction